संस्थेचा इतिहास

     वाळवा तालुक्यात उरूण इस्लांपूर परिसरातील ग्रामीण भागामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या, एका क्रांतीकारकाच्या विचारातून साकार झालेले शैक्षणिक संकुल पारतंत्र्याच्या काळात ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हे सत्य जाणलेल्या रामनामे गुरूजींच्या विचारातून साकार झालेले शिक्षण शिल्प म्हणजे ‘आदर्श बालक मंदिर’. नावातच ज्यांच्या ‘राम’ आहे आणि कर्माने सुध्दा रामरूप असलेल्या आण्णांनी या शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेढ रोवली.

    शिक्षण म्हणजे संस्कार आणि संस्काराचे शिक्षण देणे ही काळाची गरज आण्णांनी जाणली होती. व्यक्तीमत्वाचे विकास घडविणे म्हणजेच शिक्षण असते. हे मर्म जाणलेल्या आण्णांनी मनावर व वाचेवर संस्कार करण्याचा प्रयत्न या शाळेतून केला. मनाचे श्लोक, पाढे पाठांतर आणि उलटे पाढे हेच या संस्काराचे स्वरूप होते. आण्णांचे व्यक्तीमत्व शिस्तप्रिय होते. त्याचप्रमाणे शिस्तीसाठी आण्णांची शाळा या पंचक्रोषीत प्रसिध्द होती आणि आहे. ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे अतिषय निस्वार्थी, निस्पृह अशा आण्णांनी शाळेची जोपासना केली. आपल्या कर्तृत्वाने आणि प्रयत्नाने आदर्श बालक मंदिर या शाळेने या पंचक्रोषीत आसपासच्या सर्व खेडेगावात शाळेचे नाव पोहोचविले आहे.

     शिष्यवृत्ती, दहावीचे निकाल, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा अशा अनेक बाजूंनी संस्थेची प्रगती होत आहे. शाळेची प्रगती हीच आपली ओळख आहे. आज अखेर शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी वेगवेगळया क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवून शाळेचे / संस्थेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे आण्णांनी शाळेची धुरा तितक्याच खंबीर, मजबूत आणि निस्वार्थी माणसांच्या हातात सोपविली. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक विद्यार्थीप्रिय असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात देताना आण्णांना अभिमान आणि आत्मविश्वास होता. मी लावलेले हे छोटेसे रोप उद्या वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना ‘खाल्या मिठाला माणसाने जागावे’ त्या तत्वाने कै.प्रल्हाद हरी देशपांडे, कै.माधवराव रामचंद्र नानिवडेकर, कै.अनंतराव विष्णूपंत कुलकर्णी, कै.मनोहर भिमराव पोतदार व श्री.पन्नालाल हिम्मतलाल शहा या माणसांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण या शाळेची जोपासना करण्यासाठी खर्च केला. बहुजन, कष्टकरी समाज, शेतकरी समाज यावर्गाला शिक्षणाची संजीवनी उपलब्ध करून देणारी शाळा म्हणजे आदर्श शैक्षणिक संकुल इथे ना कुणी गरीब आणि श्रीमंत, इथे ना कुणी उच्च आणि नीच, इथे सर्व सारखे या सरस्वतीच्या मंदिरात माणसातला माणूस शोधणे हेच आमचे ध्येय, माणूस घडविणे हेच आमचे काम.

     प्रथम पहिली ते चौथी, नंतर ५ वी ते ७ वी व त्यानंतर ८ वी ते १० वी अशी हळूहळू प्रगतीचे एकापेक्षा एक टप्पे पुढे सरकत प्रत्येक वर्गाच्या ६-६ तुकडया पर्यंत पोहोचलेले हे शैक्षणिक संकुल. संकटाला, अडचणीला तोंड देत आज इतक्या विस्तृत स्वरूपात आपणास पहायला मिळत आहे.

   श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद थोरामोठयांचे मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्न करणारी माणसे असा सुंदर मिलाफ आपणाला या शैक्षणिक संकुलात पहायला मिळतो. सर्वांगिण विकासासाठी लागणारे सर्व प्रयत्न करणे हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

   दहावीचा निकाल, गुणवत्ता यादी हे आपल्यासाठी खूप महत्वाचे. यासाठी इयत्ता ९ वी चा निकाल लागल्यानंतर म्हणजे ३० एप्रिलला पालकांचा मेळावा घेतला जातो. पूर्ण वर्षाचे नियोजन यावेळी सांगितले जाते. पालकांना आपल्या पाल्यांबाबतच्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते.

   प्रत्येक वर्षी १५ मे पासूनच १० वी ची तयारी केली जाते. अभ्यासक्रम सुरू केला जातो. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाचे जादा मार्गदर्शन वर्ग सुरू केले जातात. शाळा सुरू झाल्यानंतर दररोज सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत मार्गदर्शन वर्ग परीक्षेपर्यंत सुरू असतात.

   डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात अभ्यासक्रम पूर्ण केला जातो.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार वर्ग तयार केले जातात व मार्गदर्शन केले जाते.

   विषेश गुणवत्ताधारक विद्यार्थी निवडून त्यांच्याकडून जादा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेवून त्या तपासून दिल्या जातात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. दहावीचा निकाल वाढण्यास याची खूप मदत होते अगदी गुणवत्ता यादीतसुध्दा विद्यार्थी येवू लागले. १९८७ पासून चालू असलेला उपक्रम आजअखेर अखंड असाच चालू आहे.

   विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रात सुध्दा विकास होण्यासाठी सतत धडपड चालू आहे.

     शासनाने संगणक प्रयोशाळा सुविधा देण्याअगोरदच संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ८ वी पासून संगणक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. आज शासनाने दिलेल्या दोन व संस्थेची एक अशी तीन सुसज्ज संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळाच्या शाखांमधून १९८७ पासून आदर्श बालक मंदिर हायस्कूल, पेठ मधून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेवून समाजामध्ये प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. ‘अनुभव संपन्न ज्ञानातून जीवनविकास’ हे आमचे ब्रीद सर्वांग सुंदर अनुभव, बौध्दिक, शारिरीक आणि मानसिक सर्व क्षेत्रातील अनुभवाची संधी उपलब्ध करून देणे आणि व्यक्तीमत्वाचा सर्वांगसुंदर विकास करणे आणि अशी पिढी तयार करणे जे देशाचे सुजाण नागरिक बनतील. स्वतःचा, आपल्या घराचा, शाळेचा आणि आपल्या गावाचा नावलौकिक कोसोदूर पोहोचवतील. आज देशाला याचीच गरज आणि स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्तप्रियता हीच आमची त्रिसूत्री आहे. या शैक्षणिक कार्यात सर्वांनीच मनापासून सहभागी व्हावे.