'आधारवड' प्रल्हाद हरी देशपांडे सर

कै. प्रल्हाद हरी देशपांडे सर

     श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळाचा ‘आधारवड’ म्हणजे देशपांडे सर विद्यार्थी शाळा शिक्षण व शिक्षक या अथांग सागरात मुक्त विहार करणारे देशपांडे सर. रामनामे आण्णांच्या घरी जाणे येणे होते. श्री देशपांडे सरांच्या पडत्या काळात आण्णांनी सरांना खूप मदत केली. देव कुणाच्या ना कुणाच्या रुपात भेटतो आणि आपली कठीण वेळ पार करण्यास मदत करतो त्याप्रमाणे रामनामे आण्णांनी आणि आत्यांनी(कमलाबाई रामनामे) त्यांना अशीच मदत केली. सन १९७९ वार्धक्याने थकलेल्या आण्णांनी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये असलेली ही शाळा व संस्थेची धुरा विश्वासाने देशपांडे सरांच्या खांद्यावर दिली व ते निर्धास्त झाले. आपल्या कठीण परिस्थितीत आण्णांनी केलेली मदत विसरून जाणारे देशपांडे सर नव्हते. त्यांनी एका कृतज्ञतेपोटी ती धुरा आत्मविश्वासाने खांद्यावर घेतली व आण्णांचा विश्वास सार्थ ठरविला. देशपांडे सर वारणानगर येथे शिक्षकाची नोकरी करीत होते. नोकरीच्या ठिकाणी सर कधीच कमी पडले नाहीत. कुठलीच जबाबदारी नाकारली नाही. शिवाय इस्लांपूर येथील शाळेचे शिवधनुष्य पूर्ण ताकदीने पेलले.

     श्री तुळजाभवानी शिक्षक मंडळ ही संस्था म्हणजे ज्ञान, विज्ञान, विद्वत्ता आणि दूरदृष्टी असणाऱ्या समाजातील एका सेवाभावी दिग्गजांची मांदियाळी. यामध्ये चारीत्र्यसंपन्न वकील व आपल्या बुद्धिमत्तेवर समाजात मानाचे स्थान मिळविणारे असे अत्यंत शिस्त प्रिय हाडाचे शिक्षक म्हणजे अॅड श्री. माधवराव रामचंद्र नानिवडेकर सर. शिक्षणाबद्दल अपार प्रेम असणारा. बुद्धिवंतांची कदर करणारा, ज्यांच्या हार्डडिस्कमध्ये इस्लांपूर शहरातील एस.एस.सी. बोर्डाचा टक्केवारीसह निकालच नव्हेतर शहराचा शैक्षणिक इतिहास आपसुक फीट्ट बसला आहे असा सुपर कॉम्प्युटर म्हणजे श्री. पन्नालाल हिम्मतलाल शहा सर. समाजाबद्दल अपार कळवळ असणारा, वेगळ्या क्षेत्रात काम करणारे पण संस्थेवर पोटच्या लेकरासारखे प्रेम करणारे श्री. मनोहर भीमराव पोतदार तथा दादा. शरीर विज्ञानाचा अभ्यास करणारे पण त्यांचे मन जाणणारे, शाळेबद्दल खूप मोठे स्वप्न पाहणारे, त्याचा आग्रह करणारे डॉ.शरद मधुकर आठले तथा आप्पा. या सर्वांची सुरेख गुंफण करून आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्याची अखंड धडपड, हिमालयाची उंची, सह्याद्रीची छाती, उत्साहाचा अखंड झरा, वाघाची तडफ आणि कोणत्याही अवघड कामाला / संकटाला न डगमगता निधड्या छातीने भिडणारा एक योद्धा, सामान्य व्यक्तीत असामान्य होण्यासाठीचा राजमार्ग दाखविणारा दिशादर्शक श्री. प्रल्हाद हरी देशपांडे सर हे सर्वांचे मेरुमणीच होते. त्यांच्यासोबत जे आले. सहवासात राहिले. त्यांना जीवनाची संजीवनी देणारे देशपांडे सर स्वप्न बघण्याची आणि ती इथेच पूर्ण करण्याची अशी उमेद देणारे देशपांडे सर इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे देशपांडे सर.

     सर असे म्हणायचे की, जर श्रद्धा आणि प्रयत्न असेल तर गवताला सुद्धा भाले फुटतात त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. ‘आश्चर्य’ घडवायचे असेल तर त्या कार्यात जीव ओतला पाहिजे. “मनापासून करा अवघड काहीच नाही” असा मंत्र त्यांनी स्वतः जपला व इतरांना दिला. आदर्श बालक मंदिराचा एक एक चिरा चढत गेला. हळू हळू विद्यार्थी संख्या वाढू लागली. पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंतच नव्हेतर पंचक्रोशीच्या कानाकोपऱ्यात आदर्श बालक मंदिराचे नाव पोहोचले. तट्ट्यापत्रा तसेच साध्या इमारतीमधील ही शाळा भक्कम अशा सिमेंट काँक्रीटच्या इमारतीमध्ये अवतरली हे सारे सोपे नव्हते. जे करायचे ते फक्त शाळेच्या व संस्थेच्या प्रगतीसाठीच हा ध्यास मनी धरून वाटचाल करताना देशपांडे सरांनी पालक व दानशूर व्यक्तीच्या पुढे मदतीसाठी हात पसरायलाही मागे पुढे पाहिले नाही.

     देशपांडे सरांनी खूप पराकाष्टेचे प्रयत्न केले. विद्यार्थ्यांची व वर्गांची संख्या वाढू लागली. आदर्श बालक मंदिर सोबत फक्त मुलींच्यासाठी स्वतंत्र कन्या शाळा सुरु केली. रामनामे आण्णाच्या बरोबरच त्यांच्या सहधर्मचारिणीनीचे कार्तुव्त, त्याग, धडपड, सोशिकता या गोष्टींना सुद्धा न्याय दिला पाहिजे हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीला सुचले आणि त्यांनी कन्या शाळेचे कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय असे नामकरण केले. नंतर श्री सिद्धीविनायक ट्रस्ट, दादर, मुंबई यांची भरघोस मदतही संस्थेस मिळाली. त्याची अत्यंत काटकसरीने पै पैशाचा चोख हिशोब ठेवत, संस्था निधी उभारून त्यांची भर घातली व शाळेची सुंदर देखणी इमारत उभी केली. व्हरांड्याच्या खांबापासून ते इमारतीच्या रंगापर्यंत सरांचा परिस्पर्शी झालेला आहे. आपल्या घरातील गोष्टी सुद्धा इतक्या बारकाईने पाहिल्या नसतील, त्यापेक्षा जास्त शाळेकडील व संस्थेकडील गोष्टींकडे सरांचा कटाक्ष होता.

     माणूस माणसाला भेटतो ते एक पूर्वसंचित असते, मागील जन्माचा ऋणानुबंध असतो. त्या शिवाय देशपांडेसरांसारखी माणसे भेटत नाहीत. आदर्श परिवारातील प्रत्येक जण भाग्यवान आहे. कारण आम्हाला सरांचा सहवास व मार्गदर्शन मिळाले. देशपांडे सर हे आमच्या आयुष्याचे शिल्पकार होते. मुख्याध्यापक, अध्यापक, कर्मचारी, शिपाई यांचेसाठी ते सचिव नव्हते तर ते आमच्या आदर्श परिवाराचे पितामह भीष्म होते. जिथे जाईल तिथे आपले अस्तित्व निर्माण करणारे सर, त्यांच्या मनापर्यंत पोहोचणारे सर, स्वतः तावून सुलाखून सिध्द झालेले एक रत्न होते. प्रचंड अनुभव, दूरदृष्टी, गरीबाबद्दलची कणव, लेकी-सुनांसाठी हृदयात कालवाकालव झालेला एक भावूक बाप, शिस्त व संस्कारासाठी आग्रही असणारा कणखर बाप, अशी अनेक रूपे देशपांडे सरांच्या रूपाने पहावयास मिळाली.

     देशपांडे सरांनी अविरत प्रयत्न करून हि संस्था नावारूपाला आणली, समृध्द केली. इथल्या कणाकणात सर सामावले आहेत. आज दहा वर्षे झाली तरीही अजून चिरस्मृतीत असणारे देशपांडे सर श्री तुळजाभवानी चरणी सर्वस्व अर्पण करणारे एक महान तपस्वी आहेत.